कर्नाटकात माय मराठीची अवस्था
कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद ही संस्था कर्नाटक राज्यात खास करून सीमावर्ती भागात मराठी भाषा,साहित्य आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी मागील ४३ वर्षांपासून अविरतपणे झटत आहे.कन्नड भाषिक वातावरणात राहूनही मराठी सांस्कृतिक जीवनाला प्रोत्साहन देत आहे.मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रदीर्घ काळापासून धडपडणारी कर्नाटकातील एक महत्वाची प्रमुख मराठी संस्था बनून राहिली आहे.
कर्नाटकातील कन्नड भाषा,साहित्य,संस्कृती आणि सामाजिक जीवनाशी समरस होऊन आजपर्यंत कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेतर्फे अनुक्रमे गदग, कलबुरगी (गुलबर्गा), माणिकनगर, बिदर, भालकी व औराद या ठिकाणी यशस्वीरित्या राज्यस्तरीय साहित्य संमेलने घेतली गेली.राज्यातील जेष्ठ व नवोदित कवी लेखकांनी लिहिलेली अनेक पुस्तके परिषदेने प्रकाशित करून मराठी भाषिक लेखक कवींना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.मागील अकरा वर्षांपासून परिषदेच्या वतीने संस्थेचे मुखपत्र त्रैमासिक "माझी मराठी"अंक नियमितपणे काढला जातो.या त्रैमासिकात कर्नाटकात घडणाऱ्या साहित्यिक घडामोडींचा आढावा घेतला जातो.साहित्य क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी व विशेष लेख त्यातून प्रसिद्ध केले जातात.नव्या जुन्या लेखकांना प्रतिवर्षी पुरस्कार देण्याचे काम परिषद अविरतपणे करीत आहे.
मागील चार दशकापासून कन्नड भाषेच्या प्रभावाखाली द्विधा मनःस्थितीत सापडलेला सीमाभागातील मराठी माणूस आज हतबल झाला आहे.आतापर्यंतच्या चार पिढ्या सीमालढ्यात बर्बाद झाल्या आहेत. कर्नाटकात मराठी माणूस कानडी अथवा इंग्रजी भाषेकडे वळल्याने मराठी भाषिकांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे.मराठी शाळा बंद पडत आहेत.एकविसाव्या शतकातील तेवीस वर्षे पसार झाली आहेत.साठ वर्षाच्या भाषिक संघर्षात येथील मराठी माणूस ना आईच्या कुशीत राहिला ना मावशीच्या पदरात.
कर्नाटक ही आमची जन्मभूमी आणि मराठी आमची मातृभाषा असल्याने येथील मराठी माणूस मानसिकदृष्ट्या ना कर्नाटकचा राहिला ना महाराष्ट्राचा. महाराष्ट्र सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिक संस्थाना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन देतच आहे परंतु प्रत्यक्षात मराठी साहित्य संस्थाना एक रुपया पण कोणाकडून मिळाले नाही.आर्थिक बाजू अत्यंत कमकुवत असतानाही येथील मराठी माणूस पदरमोड करून मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.येथील मराठी कवी,लेखक स्वखर्चाने पुस्तके लिहून प्रकाशित करीत आहेत. महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील मराठी साहित्यिकांची पुस्तके मोफत छापण्याची जबाबदारी घेतली तरी फार मोलाचे सहकार्य होईल.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलताना बृहनमहाराष्ट्रातील साहित्यिक संस्थाना विशेष अनुदान देण्याची घोषणा प्रतिवर्षी केली जाते. परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच मदत मिळत नाही.मराठी माणूस कधी जवळ आला की त्याला केवळ आश्वासने देण्यापलीकडे सरकारकडून काहीच मिळत नाही. येथील मराठी माणूस उसने अवसान घेऊन फार काळ टिकू शकणार नाही.कर्नाटकातील मराठी साहित्य संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून भक्कम आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.
आर्थिक मदतीसाठी कळकळीचे आवाहन
कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद ही संस्था साहित्य क्षेत्रात बहुजनांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी झटत आहे.चार्वाक,गौतम बुद्ध,बसवण्णा,महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेचा विचार कायम ठेवणारी असून कर्नाटकातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या उत्तम साहित्यिक,कवी, लेखक, पत्रकार, शेतकरी, मराठी भाषिक पदवीधर विद्यार्थी,डॉक्टर आणि समाजसेवक यांचा प्रतिवर्षी विशेष सन्मान करण्याचा संकल्प केला आहे त्यासाठी समाजातील दानशूर लोकांकडून त्यांच्या कुटुंबियातील एका व्यक्तींच्या स्मरणार्थ एक लाख रुपये करामसाप खात्यावर कायमस्वरूपी ठेव ठेवून त्याच्या व्याजाच्या मोबदल्यात पुरस्कार देण्याचा विचार करीत आहे.त्यासाठी दानशूर मंडळींनी पुढे यावे असे आवाहन परिषद करीत आहे.दानशूर व्यक्तींची नावे फोटो सहीत वेबसाईटवर नाव घोषित करण्यात येईल.अशा विधायक कार्यक्रमाने येथील मराठी भाषिकांना नवी ऊर्जा मिळेल अशी अपेक्षा आहे.
कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद ही संस्था अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची नोंदणीकृत समाविष्ट संलग्न संस्था आहे. परिषदेकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही.त्यामुळे निधीची तीव्र टंचाई जाणवते आहे.अशा परिस्थितीतही सर्व साहित्यिक कार्यक्रम स्थगित करणे शक्य नाही व योग्यही नाही.आजची तरुण पिढी पुस्तके वाचायला तयार नाहीत. मराठी साहित्य क्षेत्राला अधिक गती मिळावी म्हणून या अडचणीच्या परिस्थितीत डिजिटलायझेशन करायचे आहे.परिषदेने मराठी साहित्य वेबसाईटवर आणले आहे. तमाम मराठी भाषा प्रेमींनी कर्नाटकातील मराठी साहित्य चळवळ जिवंत ठेवण्यासाठी शक्य तेवढी आर्थिक मदत करावी.अशी कळकळीची विनंती आहे. नाहीतर इतकी प्रदीर्घ परंपरा असलेल्या संस्थेला आपले काम स्थगित करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. कमीतकमी पाच हजार रुपये आर्थिक मदत करणाऱ्या सर्व दानशूरांची नावे वेबसाईटवर लावण्यात येतील.समाजातील प्रज्ञावंतांनी याचा विचार करावा आणि सढळ हातानी मदत करावी अशी कळकळीची विनंती परिषद करीत आहे
धन्यवाद !
आपला विश्वासू
अध्यक्ष व पदाधिकारी
कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद
कलबुरगी.