top of page
परिषदेची स्थापना
 कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेची वाटचाल व भूमिका

       कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेला सुमारे चौवेचाळीस वर्षांचा इतिहास आहे. १९७९ साली कर्नाटकातील गदग येथील मराठी वाङ्मयप्रेमी मंडळाच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी जमलेल्या  राज्याच्या   विविध भागातील मराठी साहित्यिकांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात दि. १४ जानेवारी  १९७९ रोजी  कर्नाटक राज्य  मराठी साहित्य परिषद 'या संस्थेची सर्वानुमते स्थापना झाली.परिषदेची स्थापना करताना राज्यात राष्ट्रीय भावैक्य जोपासण्यांबरोबरच कर्नाटकच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवन प्रवाहाशी  समरस होऊन कर्नाटक राज्यात  मराठी भाषा,साहित्य व संस्कृती टिकवून ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.कर्नाटक राज्य हे  या संस्थेचे साहित्यिक कार्यक्षेत्र राहील आणि  संस्था मराठी भाषिकांची प्रातिनिधिक संस्था' म्हणून राज्य पातळीवर कार्य करील' करामसापच्या  उपक्रमांचा भाग म्हणून  संस्थेच्यावतीने कर्नाटकात साहित्य संमेलने घेण्याचे ठरले. त्यानुसार आजपर्यंत अनुक्रमे गदग, गुलबर्गा, माणिकनगर, बीदर,भालकी व औराद या ठिकाणी यशस्वीरित्या साहित्य संमेलने घेतली गेली. परिषदेच्या वतीने  संस्थेचे मुखपत्र त्रैमासिक "माझी मराठी"अंक काढला जातो.या त्रैमासिकात कर्नाटकात घडणाऱ्या साहित्यिक घडामोडींचा आढावा घेतला जातो.साहित्य क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी व विशेष  लेख त्यातून प्रसिद्ध केले जातात. 

            नव्हेंबर १९९२ ला कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष  स्वातंत्र्य सेनानी स्व. डॉ.वि.पा.तथा भाऊसाहेब देऊळगावकर यांच्या जीवनावर अमृत महोत्सव-विशेष गौरवांक काढला गेला. तत्कालीन संपादक डॉ.चंद्रशेखर कपाळे यांनी याबाबतची स्पष्ट भूमिका खालील शब्दांत मांडली होती' “माझी मराठी” हे करामसापचे  मुखपत्र त्रैमासिक म्हणून प्रसिद्ध करण्याची आरंभी योजना होती. प्रथम 'मायबोली'या नावाने त्याचे दोन अंक प्रसिद्ध झाले.परंतु ते  नाव इतर एका  नियतकालिकाने आधीच घेतले गेल्याने  त्या नावाच्या नोंदणीस मान्यता मिळाली नाही. म्हणून ते नाव बदलून “माझी मराठी” 'हे नाव सुचविले आणि त्याला पुढे मान्यता मिळाली.परंतु नंतर काहीं काळ आर्थिक कारणाने अंक काढणेच अशक्य झाले.पुढे  जानेवारी १९९१ मध्ये, गदग येथे परिषदेने भरविलेल्या कर्नाटकातील मराठी भाषिकांच्या प्रथम साहित्य संमेलनाच्या निमित्ताने  “माझी मराठी” चा  विशेषांक काढण्यात आला. त्यानंतर श्री. वि. पां. तथा भाऊसाहेब देऊळगावकर गौरवांक म्हणून डिसेंबर १९९३ ला कलबुरगी (गुलबर्गा) येथे दुसऱ्या संमेलनाच्या निमित्ताने कर्नाटक राज्यातील मराठी भाषिकांनी व साहित्यिकांनी या संमेलनाच्या निमित्ताने एकत्र येऊन आपल्या भाषिक, साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आदी समस्यांसंबंधी विचारविनिमय करावा व काही मार्ग शोधावेत अशी भूमिका घेतली गेली.  

         जून १९९५ ला माणिकनगर,ता.हुमनाबाद येथे कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे तिसरे साहित्य संमेलन भरले होते त्यावेळी  त्या भागातील सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे दर्शन घडविणारे सामाजिक, साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडी आणि ऐतिहासिक  स्थळांची माहिती देणारे लेखही विशेषांकात असावे'अशी भूमिका घेतली. जून १ ९९ ७ मध्ये बिदर येथे,डॉ भाऊसाहेब तथा वि.पां. देऊळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली चौथे साहित्य संमेलन घेण्यात आले.त्यावेळीसुद्धा अशीच भूमिका घेतली गेली. साधारणपणे या स्मरणिकेचे स्वरूप ठरलेले आहे.ज्या विभागात हे संमेलन भरविले जाते त्या विभागाची लेख वैशिष्ट्ये स्पष्ट करणारे अंकात देणे,त्या भागातील नवोदित कवी,लेखक आदि साहित्यिकांचे लेख प्रकाशित करून कर्नाटकातील उगवत्या मराठी साहित्यिकांना मराठी साहित्य क्षेत्रात सामावून घेणे मुख्य उद्देश आहे. 

          कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेकडे आर्थिक स्थिती भक्कम नसताना देखील केवळ मराठी भाषेच्या  प्रेमापोटी येथील मराठी भाषा प्रेमींनी मराठी भाषा टिकवून ठेवली आहे.मराठी भाषिकांनी पदरमोड करून  डिसेंबर २००३ ला,भालकी येथे पाचवे साहित्य संमेलन यशस्वी  केले.त्या संमेलनाच्या निमित्ताने विशेष अंक काढण्यात आला.ऑक्टोबर २०१३ मध्ये का स वाणी धुळे व कारामसाप यांच्य संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय राष्ट्रीय विचारवेध अधिवेशन घेण्यात आले.या अधिवेशनात महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांनी हजेरी लावली होती. हुमानाबाद तालुक्यातील घाटबोरुळ, बसवकल्याण  आणि भालकी येथील अनेक नवोदित कवी लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.

          कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषेदेने अखिल भारतीय मराठी साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी केली असून येथील कवी लेखकांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.स्व. प्राचार्य भालचंद्र शिंदे,प्रा.विजयकुमार चौधरी,बी ए कांबळे व व्यंकटेश वळसंगकर यांची अनेक पुस्तके अखिल भारतीय साहित्य क्षेत्रातील नामवंत साहित्यिकांना भुरळ घातली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात येथील कवी प्रा विजयकुमार चौधरी,बी.ए. कांबळे,अनसुया पाटील,ॲड स्व.दयानंदराव बिरादार वकील, गुरय्या रे स्वामी,प्रभाकर सलगरे इत्यादी साहित्यिकांनी उत्तम कामगिरी बजावली आहे.या व्यतिरिक्त सत्तरी ओलांडलेल्या श्रीमती शकुंतला सोनार,सुमन शेगेदार ॲड.प्रदीप एन. शहा,आळंद यांनी दर्जेदार पुस्तके काढली आहेत हे उल्लेखनीय. 

      कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेसाठी येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ एन.जी. घानाते,डॉ दिनकर मोरे यांनी आर्थिक मदत करीत परिषदेच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहेत. या व्यतिरिक्त माजी आमदार मारुतीराव माले,परिषदेचे उपाध्यक्ष कै. हरिहरराव जाधव इंजिनिअर, इंदुमती सुतार,राधिका घोगले,डॉ मिलिंद उमाळकर,श्रीमती निर्मला कलबुरगी,वंदना किणीकर,सुनील चौधरी, बालाजी काटकर, अशा अनेकांचे योगदान परिषदेला लाभले आहे.

          कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेची स्थापना करून कर्नाटकात मराठी भाषा, साहित्य आणि सांस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आपले जीवन समर्पित केलेले माजी अध्यक्ष अनुक्रमे डॉ वि.पा.देऊळगावकर, डॉ.चंद्रशेखर कपाळे, श्री जे. एन.कदम, प्राचार्य भालचंद्र शिंदे यांच्यासारखे निष्ठावंत साहित्यिक आज आमच्यात राहिले नाहीत ही आमची खंत साहित्य  क्षेत्रात काम करीत असताना मनाच्या एका कोपऱ्यात  अंधार पसरविणारी आहे. 

        कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद पुरोगामी,परिवर्तनवादी विचाराशी बांधिलकी ठेवली असून कन्नड भाषा,साहित्य आणि  संस्कृतीशी नाळ जोडली आहे.कन्नड भाषेतील अनेक पुस्तके मराठीत आणि मराठीतील दर्जेदार साहित्य कन्नड भाषेत प्रकाशित करण्याचे कार्य कारामसाप करीत आहे त्यामुळे येथील सामाजिक,भाषिक सौहार्द कायम राहिले आहे. महाकवी द.रा.बेंद्रे यांच्या समरसवे जीवन(समरसता हेच जीवन) या उक्तीप्रमाणे कर्नाटकात राहून माय मराठीची  सेवा येथील मराठी साहित्यिक करीत आहेत.

          कर्नाटकातील अल्पसंख्याक  मराठी भाषिकांना संघटीत करून  जेष्ठ साहित्यिक आणि नवोदीत कवी,लेखकांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी कर्नाटक  राज्य मराठी साहित्य परिषद सतत कार्यरत आहे.मागील जुलै महिन्यात कारामसाप ची एक शाखा बंगळुरू येथे काढण्यात आली असून बंगळुरू शहर,म्हैसूर मंड्यासह तेथील प्रदेशात विखुरलेल्या मराठी भाषिकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न म्हणून जेष्ठ मराठी लेखिका डॉ.संध्या राजन अणवेकर यांची बेंगळुरू विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.तसेच प्रसिद्ध मराठी गझलाकार कवी दीपाली महेश वझे यांची कार्यवाह म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

        नवोदीत कवी लेखक म्हणून प्रा.मीनाक्षी काळे पाटील(भालकी),प्रा.विलास साळुंखे, शिला  कदम(बसवकल्याण),सर्वोत्तम सताळकर,सौ.वंदना किणीकर,प्रज्ञा करंदीकर बंगळुरू,अर्चना देसाई बंगळुरू,नूतन शेटे बंगळुरू, लीना पेडणेकर बंगळुरू,शिवाजी काळे होळसमुद्र,अनुसुया पाटील,आनंद जाधव(बसवकल्याण)अमृत आकरे,तानाजी सावरे(घाटबोरुळ),सूर्यकांत ससाने,प्रा.संजीव सूर्यवंशी असे अनेक कवी लेखक कर्नाटकात नव्या उमेदीने कार्य करीत आहेत. 

                                                                   

गुरय्या रे.स्वामी (अध्यक्ष)

कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद,

कलबुरगी. ५८५१०२

bottom of page