भावपूर्ण श्रध्दांजली
प्रा.व्यंक टेश वळसंगकर

कलबुरगी दि.१६ नोव्हेंबर २०२३
येथील जेष्ठ मराठी साहित्यिक,नामवंत कवी व कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे सदस्य प्रा.व्यंकटेश शामराव वळसंगकर (७२) यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद पोरके झाले असून करामसापचे माजी अध्यक्ष प्राचार्य भालचंद्र शिंदे यांच्या निधनाला अद्याप सहा महिने पूर्ण झाले नाहीत.शिंदे सरांच्या निधनाने झालेल्या दुःखातून परिषद अद्याप सावरले नसताना प्रा.व्यंकटेश वळसंगकर यांचे निधन म्हणजे मराठी साहित्य क्षेत्रावर खास करून सीमाभागातील तमाम मराठी साहित्य रसिकांवर झालेला कुऱ्हाडीचा वार आहे.मराठी साहित्य परिषदेच्या प्रत्येक कार्यक्रमात जातीने हजर राहणारे प्रा.वळसंगकर सर आज आमच्यात राहिले नाहीत.
प्रा.वळसंगकर यांची एकूण नऊ पुस्तके प्रकाशित झाले असून चार पुस्तके प्रकाशनाच्या प्रतिक्षेत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेक वेळा सहभागी झाले होते. पुणे येथे (६३वे), पणजी येथे(६७वे) अहमदनगर(७०वे) बेळगाव (७३ वे ), कऱ्हाड (७६वे),मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांनी सहभाग घेतला होता. 'आभाळ लेण काव्यसंग्रह (१९८४), सांज क्षितिज (काव्यसंग्रह), १९८८, शब्द संगत (समीक्षा) १९९१,काळं कोंदण (काव्यसंग्रह) १९९४, कानेकोपरे (लेखसंग्रह) १९९६, आठवडोह (काव्यसंग्रह) २००१, कासव ठसे(ललित लेख)२००५,भावपदर (व्यक्तिविशेष) २०१९ (आत्मप्रत्यय) २०१९ अशी त्यांची एकूण नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मौनधरून(काव्यसंग्रह),वेचले कण (परीक्षणे),घनओघळ(काव्यसंग्रह), चांदण कोष(विविध लेख)अशी चार पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
प्रा.वळसंगकर यांच्या अनेक कविता,लेख इत्यादी साहित्य महाराष्ट्रातील दर्जेदार दिवाळी अंक,नियतकालिके व अनेक दैनिकातून प्रकाशित होत असत.त्यांना म्हैसूर दसरा कविसंमेलनात सहभाग घेतल्याबद्दल गौरव करण्यात आला असून महाराष्ट्र व कर्नाटकातून अनेक संस्थानी पुरस्कार देऊन गौरविले आहेत. त्यांना सर्वजण कविराज या टोपण नावाने ओळखत असत.त्यांच्या निधनाने मराठी साहित्य परिषदेची अपार हानी झाली असून एक निस्पृह व्यक्तीमत्व,मराठी भाषा प्रेमी,कुशल वक्ता आणि शीघ्र कवी म्हणून मराठी साहित्य क्षेत्रात त्यांची कायमची ओळख राहील. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांना परिषदेतर्फे भावपूर्ण श्रध्दांजली
अध्यक्ष व सर्व पदाधिकारी
कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुरगी.